नाना पटोले… काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या नानांची चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे नाना कधी दिल्लीत जातात, तर कधी राज्यात स्वबळाची भाषा करतात. मात्र याच नानांवर सध्या काँग्रस नेते राहुल गांधी कमालीचे खूश असून, नानांना येत्या काही दिवसांत मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. खुद्द राहुल गांधी यांनीच नानांच्या मंत्रिपदासाठी अनूकुलता दाखवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
याचसाठी नाना आज दिल्लीत गेल्याचे सूत्रांनी सांगितले. आज राहुल गांधी यांच्याशी नाना पटोले यांची चर्चा झाली. यावेळी केसी वेणुगोपालही उपस्थित होते. महाराष्ट्रात आज इतर पक्षांची जी काय स्थिती आहे, त्यात काँग्रेसचा बेस सर्वाधिक आहे. काँग्रेसचा बेस नियोजनबद्ध पद्धतीने कसा वाढवायचा त्यावर सखोल चर्चा या बैठकीत झाली, असे खुद्द नानांनी सांगितले. मात्र या बैठकीत नानांच्या मंत्रिपदावर देखील चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः मनमोहन सरकारच्या काळात झाले फोन टॅपिंग! आरटीआयच्या माध्यमातून मोठा खुलासा)
म्हणून नाना मंत्री होणार?
नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुनच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्ष वाढीसाठी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष होताच, हायकमांड आणि राहुल गांधी यांच्या आदेशांचे तंतोतंत पालन केले. एवढेच नाही तर स्वबळाची भाषा करत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, काँग्रेसची दखल घेण्यास भाग पाडले. नानांच्या याच स्ट्रॅटेजीमुळे खुद्द राहुल गांधी खूश असून, जे मंत्री मंत्रीपदाचा वापर पक्षापेक्षा स्वत:साठी करत आहेत अशा मंत्र्यांना डच्चू देण्याचा निर्णय हायकमांडने घेतला असून, नानांना मंत्रीपद मिळू शकते. नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार हे दोन्ही नेते विदर्भातील आहेत. पण ते मंत्रिमंडळात छाप पाडू शकलेले नाहीत, याचमुळे आता नानांच्या रुपाने हायकंमाड विदर्भाला आक्रमक मंत्री देण्याचा विचार करत आहे. याचमुळे येत्या काही दिवसांत नाना, ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.
(हेही वाचाः राज्यात निर्बंध शिथिल होणार?)
तर अस्लम शेख यांचे मंत्रीपद धोक्यात
नव्या फेरबदलात काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांचा फारसा प्रभाव पडू शकलेला नाही. तसेच पक्षासाठी या दोन्ही नेत्यांच्या मंत्रिपदाचा फायदा झाला नसल्यानेच या दोन नेत्यांना डच्चू मिळून, नाना पटोले आणि प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद मिळू शकते अशी माहिती मिळत आहे. अस्लम शेख यांचा मुंबईत फारसा प्रभाव दिसू शकलेला नाही. त्यामुळे मंत्रिपदापासून दूर ठेऊन त्यांना पालिका निवडणुकीच्या कामाची जबादारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच आता फक्त पक्षाला उभारी देणाऱ्या नेत्यांनाच मंत्रीपद दिले जाणार, असा निर्णय हायकमांडने घेतल्याचे समजत आहे.
(हेही वाचाः आषाढी एकादशीनिमित्त मोदी-शहांकडून मराठीत शुभेच्छा! निवडणुकांचे वारे की आणि काही…?)
Join Our WhatsApp Community