महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत, काँग्रेसने दिला थेट इशारा! राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. पण सत्ता गमावल्यानंतर आता महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचे पहायला मिळत आहे. महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नसून ती कायमस्वरुपी नाही असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या फुटीचे संकेत दिले आहेत.

काँग्रेसमध्ये नाराजी

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस देखील इच्छुक होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा न करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्याबाबत परस्पर निर्णय घेण्यात आल्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये नाराजी आहे. नाना पटोले यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीत बिघाडी)

पटोलेंचा इशारा

महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही. विपरित परिस्थितीत राज्याच्या जनतेसाठी हितासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यावेळी ही आघाडी केली. त्यावेळीही आम्ही विरोधी बाकांवर बसायला तयार होतो. त्यामुळे ही काही कायमस्वरुपी आघाडी नाही असे पटोले यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येत नसतील तर आघाडीबाबत विचार करावा लागेल, असा थेट इशारा देखील नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here