काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्या स्वबळाच्या वक्तव्यांमुळे सध्या चांगलेच चर्चेत असून, त्यांच्या स्वबळाच्या वक्तव्यामुळे सध्या महाविकास आघाडीमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, सातत्याने स्वबळाची भाषा करणाऱ्या नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा वारंवार का करावी लागते, याचे कारणही सांगितले. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी स्वबळाच्या घोषणेवर आपण ठाम असल्याचे सांगितले. 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करत आहोत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. याआधीही आम्हाला धोका मिळालेला आहे. आता तसा धोका पुन्हा मिळू नये यासाठी पक्ष रणनीती आखेल. त्यानुसारच काम केले जाईल, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.
राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सरकार येणार
२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बनणार म्हणजे बनणारच. कारण, आज देशामध्ये भाजपला पर्याय फक्त काँग्रेस आहे. भाजपने केंद्रामध्ये बसून देश देश विकला आहे, लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. काही लोकांना तर असं वाटत आहे की कोरोना परवडला, पण ही महागाई नाही. भाजपने कोरोना आणि महागाई या दोन्हींचा संगम करुन आता देशातल्या लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. त्याचा विरोध म्हणून आणि त्यांना पर्याय म्हणून आता फक्त काँग्रेस आहे. काँग्रेसच आता देशाला पुढे नेऊ शकते हा लोकांचा विश्वास आता दृढ झालेला आहे. म्हणूनच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये केंद्रात सरकार तयार होणारच, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात पण… अखेर मुख्यमंत्र्यांनी मनातलं सांगितलंच)
काल पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक
नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असताना, काल काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?, तसं स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा सवाल या तिन्ही नेत्यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पटोलेंना निमंत्रण नाही
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नव्हते. याबद्दल त्यांना विचारले असता, मला पवारसाहेबांचं निमंत्रण नव्हतं, मला त्या भेटीची माहितीही नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यावर मी विचारले, त्यावर त्यांनी मला सांगितलं ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यामुळे माझा राग वगैरे काहीही नाही. मी माझ्या पक्षाचे काम करतोय, जर माझ्या पक्षाचे काम करताना कोणाला राग येत असेल, तर मला काही अडचण नाही.
(हेही वाचाः तुमचं ठरलं असेल तर आम्हालाही सांगा, आम्हीही तयारीला लागतो! पवारांनी व्यक्त केली नानांवरची नाराजी)
Join Our WhatsApp Community