पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडिलांबाबत आक्षेपार्ह टिपण्णी करणारे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना गुरुवारी दिल्ली विमानतळाहून ताब्यात घेण्यात आले. खेडा इंडिगोच्या फ्लाइटने दिल्लीहून रायपूरला जाणार होते. ते फ्लाईटमध्ये चढले होते. पण त्यांना विमानातून उतरवून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणानंतर काँग्रेस नेत्यांनी विमानतळावरच धरणे आंदोलन सुरू केले.
पवन खेडा यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केले होते. याप्रकरणी भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अदानींच्या कथित गैरव्यवहाराबाबत पत्रकार परिषदेत बोलताना पवन खेडा म्हणाले होते की, जर अटलबिहारी वाजपेयी जेपीसी बनवू शकतात, तर नरेंद्र ‘गौतम दास’ मोदींना काय अडचण आहे? असे विचारून झाल्यावर खेडा यांनी आजूबाजूच्या लोकांना पंतप्रधानांचे मधले नाव मी बरोबर म्हटले आहे का, असा सवाल केला होता. खेडा यांनी पुन्हा तोच सवाल केला की, “नरेंद्र गौतम दास मोदींना काय अडचण आहे..?” त्यावर काँग्रेस नेत्याने विचारले की, “हे गौतम दास की दामोदर दास ?” त्यावर खेडा म्हणाले होते की, दामोदर दास असले तरी त्यांची कामे गौतम दास सारखीच आहेत. त्यानंतर खेडा यांनी ट्विट करून सांगितले की, पंतप्रधानांच्या नावाबाबत मी संभ्रमात होतो असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
परंतु, पवन खेडा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आहेत. पवन खेडा यांच्या विरोधात भाजपने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते.
(हेही वाचा – अडीच दिवसांच्या युक्तिवादानंतर कपिल सिब्बलांचा भावनिक शेवट)
Join Our WhatsApp Community