विधान परिषद निवडणुकीत दुसरा उमेदवार पराभूत झाला. पक्षाने पहिली पसंती ठरवलेलाच हा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे पक्षाचा व्हीप कोणत्या आमदारांनी मोडला, याचा शोध घेण्याची आठवण काँग्रेसला तब्बल १५ दिवसांनी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या ७ आमदारांनी गुप्तपणे क्रॉस व्होटिंग केले. या ७ आमदारांवर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेसची ७ मते फुटली
पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा सारा तपशील त्यांच्यापुढे मांडल्याचे समजते. विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. चंद्रकांत हंडोरे यांना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या आमदारांनीही मतदान केले होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत वरकरणी काँग्रेसची तीन मते फुटल्याचे दिसत असले तरी काँग्रेसची प्रत्यक्षात ७ मते फुटल्याचे समोर आले होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यामुळे आता एच.के. पाटील दिल्लीत जाऊन हायकमांडकडे काय अहवाल देणार आणि त्यानंतर सोनिया गांधी कठोर पाऊल उचलणार का, हे पाहावे लागेल.
Join Our WhatsApp Community