उदय चोप्रा हा एक फ्लॉप ऍक्टर आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये वजन असून देखील त्याच्या अभिनयाचं करिअर चाललं नाही. धूम या चित्रपटांची सीरीज म्हणजे उदय चोप्रासाठी जणू रोजगार हमी होती. कारण धूम चित्रपट बर्यापैकी चालायचे आणि त्यात उदय चोप्रा असल्यामुळे विस्मृतीत गेलेला उदय पुन्हा लोकांना दिसायचा. त्यात तो विनोदी भूमिका करायचा अशी दाट शंका मला आहे.
राहुल गांधी हे मला राजकारणातले उदय चोप्रा वाटतात. मोठ्या कुटुंबात जन्माला येऊन देखील त्यांना राजकारणात काहीच करता आलं नाही. पूर्वजांच्या नावावर ते काही वर्षे खासदार म्हणून निवडून येत राहिले खरे! परंतु पूर्वजांच्या नावाचा किती काळ उपयोग होणार. कधी ना कधी कर्तृत्व दाखवावं लागणार आणि हे कर्तृत्व दाखवण्याची वेळ आली तेव्हा स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. म्हणूनच त्यांना पळ काढावा लागला.
आता राहुल गांधींना कॉंग्रेसने पुन्हा एकदा लॉंच करायचं ठरवलं असल्यामुळे भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. मल्लिकार्जून खर्गे हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले असले तरी कॉंग्रेसच्या लोकांची प्राथमिकता राहुल गांधी हेच आहेत. त्यामुळे तसं पाहिलं तर कॉंग्रेसच्या डोक्यावर राहुल गांधींचं ओझं आहे. राहुल गांधी यांचं राजकीय करिअर चालावं त्यासाठी कॉंग्रेस नवनवी शक्कल लढवत असते. म्हणूनच मी राहुल गांधींना राजकारणातला उदय चोप्रा म्हटलं.
आता दुसरा मुद्दा असा की, भारतीय जनता कॉंग्रेसला नाकारत आहे. अनेक राज्यांतून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे आणि कॉंग्रेसच्या लोकांना असं वाटतंय की राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसला पुन्हा अच्छे दिन येतील. भाजपाचे इतर विरोधक बर्याचदा तिसरी आघाडी असा उल्लेख करत असतात, परंतु त्यांच्या मनात देखील कॉंग्रेसबद्दल जिव्हाळा आहे हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनावरुन कळते.
आता राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. तेव्हा शिउबाठा आणि राष्ट्रवादीचे नेते देखील या यात्रेत सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात देखील कॉंग्रेसची बिकट अवस्था आहे. महाराष्ट्रात कोणतेही खंबीर नेतृत्व कॉंग्रेसकडे नाही. आता राहुल गांधीच काहीतरी चमत्कार करतील याकडे ते सर्व डोळे लावून बसले आहेत. परंतु इतर पक्ष यात का उतरत आहेत, हेच कळत नाही. भारत जोडो यात्रा हा कॉंग्रेसचा अंतर्गत कार्यक्रम आहे. यात इतर पक्षांना काय ते कर्तव्य?
शिउबाठा आणि राष्ट्रवादी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार, याचा अर्थ ते कॉंग्रेसचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घ्यायला तयार आहेत. ज्याप्रमाणे कॉंग्रेसने राहुल गांधींचं ओझं उचललं आहे, त्याप्रमाणे आघाडी-रिलीजन म्हणून इतर पक्षांनी कॉंग्रेसचं ओझं उचललं आहे. मला एकच चिंता सतावतेय, या ओझ्याखाली इतर पक्षांची कॉंग्रेस झाली नाही, म्हणजे मिळवलं.
Join Our WhatsApp Community