शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं आहे. मविआ सरकारच्या काळात नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. पण मध्येच त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जर नाना पटोलें या खुर्चीवर असते तर चित्र वेगळं असतं. पण अचानक अध्यक्षपद रिक्त झाल्यानं विरोधकांना संधी मिळाली, असं संजय राऊत म्हणाले. याला दुजोरा आता खुद्द काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं, असं म्हणतं विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवर एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘कोणामुळे सरकार पडलं म्हणण्यापेक्षा, त्यावेळेस नाना पटोलेंसारखा सशक्त माणूस आणि मजबूत अशी व्यक्ती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर होती. त्यांनी संपूर्ण सभागृह उत्तम रितेने चालवलं. सभागृहाच पूर्णतः नियंत्रण त्यांच्या हातात होत. खरंतर एक अभ्यासू आणि मजबूत अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत होता. अशावेळेस राजीनामा दिल्यानं जो काही पेचप्रसंग निर्माण झाला आणि सरकारला पायउतार व्हावं लागलं. तसंच नवीन अध्यक्षाची निवड झाली नाही, त्यावेळेस अनेकांच्या भावना होत्या की, नाना पटोलेंनी राजीनामा द्यायला नको होता. त्यामुळे सरकार कदाचित टिकलं असतं.’
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानं काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याबाबत वडेट्टीवारांना प्रश्न विचारला असतान ते म्हणाले की, ‘त्यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही हा अधिकार हायकमांडला आहे.’
(हेही वाचा – राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…)
Join Our WhatsApp Community