नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात?

विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी विरोधकांसोबतच महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पक्षांचाही अनेकदा समाचार घेतला आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवेल असा नाराही त्यांनी अनेकदा दिला. याच त्यांच्या वक्तव्यामुळे आता त्यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे आता नानांबाबत काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे नेते नानांची हायकमांड कडे तक्रार करणार असल्याचे समजते.

म्हणून काँग्रेसचे नेते नानांवर नाराज

नाना पटोलेंवर काँग्रेसचे आमदार आणि मंत्रीच नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची लवकरच हायकमांडकडे तक्रार करणार आहेत. पटोलेंच्या बेताल वक्तव्यावरुन महाविकास आघाडीत वितुष्ट निर्माण होत असल्याची भावना काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः स्वबळाची भाषा करणारे नाना नरमले)

नानांची वक्तव्य काँग्रेसला अडचणीत आणणारी

नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते वारंवार महाविकास आघाडीला अडचणीत आणत आहेत. नाना पटोलेंची रोज रोजची वक्तव्य काँग्रेसला अडचणीत आणणारी आहेत, असे काँग्रेसच्या मंत्री तसेच काही आमदारांंचे म्हणणे आहे. भाजपला बाजूला सारण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली असून, तीच नानांच्या या वक्तव्यामुळे धोक्यात येत आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसमधला एक गट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून, नानांबाबतची नाराजी व्यक्त करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here