नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर जोरदार टीका करतानाच त्यांनी अनेकदा महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पक्षांवरही सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेते नाराज आहेत. असे असतानाच आता काँग्रेसमध्येही नाना पटोलेंविरोधात अंतर्गत नाराजी पहायला मिळत आहे. नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडत असल्याचा आरोप काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळेच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे दिल्ली दरबारी जाऊन थेट राहुल गांधींकडे पटोलेंची तक्रार करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
नाना-राऊत यांच्यात वाद
मागील काही दिवसांपासून नाना पटोले-नितीन राऊत यांच्यात वाद सुरू झाला असून, हा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. नानांच्या सततच्या व्यक्तव्यामुळे देखील काँग्रेसचे राज्यातले नेते नाराज आहेत. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांच्यात या आधीही वाद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या.
(हेही वाचाः आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक लांबणीवर टाका! काँग्रेसची आग्रही मागणी)
याआधीही कुरबुरी
मंत्रीमंडळ स्थापनेच्यावेळी नाना पटोले यांनी आपल्याला ऊर्जा खाते मिळावे, यासाठी हायकमांडकडे त्यांनी शिफारस केली होती, असेही म्हटले जाते. मात्र, कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केली. तर राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते सोपवले. यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या कुरबुरी चर्चेचा विषय बनल्या होत्या.
(हेही वाचाः नानांच्या पत्राने गोंधळ, आरोप नेमका कुणावर?)
मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
काही दिवसांपूर्वी तर नानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खनिकर्म महामंडळाबाबत एक पत्र लिहिले होते. त्यात नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. यात नियमबाह्य प्रक्रिया झाली असून, हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली होती. हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
(हेही वाचाः केंद्रीय तपास यंत्रणांमुळे राजकीय गणिते बदलणार नाहीत! नवाब मलिकांचा विश्वास)
Join Our WhatsApp Community