अखेर राष्ट्रीय काँग्रेसने शिवसेना उबाठा गटासमोर नांगी टाकत सांगलीच्या जागेवरील आपला दावा सोडला आणि पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. यामुळे पक्षातील नाराज नेते आणि कार्यकर्ते सांगलीच्या निवडणूक ‘आखाड्या’त उबाठाच्या ‘पैलवान’ उमेदवाराला डोक्यावर घेतात की असहकार पुकारत माती चारतात हे काही दिवसातच समोर येईल. काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल पाटील हे बंडाच्या तयारीत असल्याचे समजते. (Congress)
उबाठाची हुकुमशाही
येत्या १-२ दिवसात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी पुढील भूमिकेबद्दल कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. एकीकडे हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना उबाठाकडून काँग्रेस पक्षावर हुकुमशाही गाजवत काँग्रेसची हक्काची जागा खेचून घेण्याची कृती करण्यात येत असल्याची भावना एका काँग्रेस कार्यकर्त्याने व्यक्त केली. (Congress)
(हेही वाचा – Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश)
काँग्रेस हायकमांड उबाठाच्या दबावाखाली
गेले महिनाभर विश्वजीत कदम यांनी सातत्याने सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा करून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी राज्यात आणि दिल्लीत प्रयत्न केले. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद न देता काँग्रेस हायकमांड शिवसेना उबाठाच्या दबावाखाली आली आणि ही जागा सोडली, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या मतदार संघात शिवसेना उबाठाची ताकद नसताना उबाठाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आणि आता ही जागा त्यांनी प्रतिष्ठेची केली. (Congress)
उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देणे टाळले
आज मंगळवारी ९ एप्रिलला महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगलीची जागा शिवसेना उबाठा लढणार असल्याचे काँग्रेस नेत्यांसामोर सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी यावर बोलणे टाळले. इतकेच नव्हे तर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना, काँग्रेस कार्यकर्ते उबाठाला सहकार्य करतील का? या प्रश्नावर उत्तर देणे टाळले. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community