नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत आता खुद्द अशोक चव्हाण यांनी खुलासा केला आहे. काँग्रेस सोडण्याचा आपला कुठलाही विचार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले चव्हाण?
विधानसभेत बहुमत चाचणीच्या ठरावावेळी काँग्रेसच्या 11 आमदारांनी गैरहजेरी लावली. त्यामध्ये विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे यांसारख्या नेत्यांसोबतच अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. त्यामुळे तेव्हाही सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाची साथ सोडणार असल्याचे बोलले जात होते. पण मी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा कुठलाही विचार केला नसल्याचे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः उद्धव ठाकरेंनंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, काय केली मागणी?)
चव्हाणांना भाजपची ऑफर
चव्हाणांच्या काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे नांदेड येथील खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाणांना भाजपा प्रवेशाची ऑफर दिली होती. बहुमत चाचणीला गैरहजर राहत अशोक चव्हाण यांनी एकप्रकारे भाजपला चांगलीच मदत केली आहे. तसेच या चाचणीवेळी अशोक चव्हाण यांनी 4 आमदारांना देखील गैरहजर ठेवले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानत असून, अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास आपण त्यांचे स्वागत करू, असे चिखलीकर यांनी म्हटलं आहे.
Join Our WhatsApp Community