दक्षिण मुंबईतील रखडलेल्या बहुचर्चित हँकॉक पुलाचा रेल्वेमार्गावर दुसरा गर्डर टाकण्याचे काम, रविवार ६ जून रोजी पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचे काम मार्च २०२१पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. परंतु दुसरा गर्डरच जून महिन्यात टाकण्यात आला असून, या गर्डरमुळे काही इमारतींच्या जवळून याचा पाथवे जाणार असल्याने, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आक्षेपानंतरही पूल विभागाने दुसरा गर्डर टाकला असला, तरी याचा आराखडा बदलायला लावून, या पुलाच्या बांधकामामध्ये आडकाठी आणण्याचे काम काँग्रेसच्या मंत्र्यांकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
तब्बल ७७ कोटींचे कंत्राट
महापालिकेच्या बी विभागातील माझगावमधील शिवदास चापसी रोडवर असलेल्या, हँकॉक पुलाचे बांधकाम धोकादायक ठरल्याने रेल्वेच्यावतीने ते तोडण्यात आले होते. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु या पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदाराची कंपनी काळ्या यादीतील असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने नव्याने निविदा मागवून या पुलाच्या बांधकामासाठी २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यांत काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स(मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. परंतु रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्वातील आय.एस.कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाईन बदलण्याची सूचना केली. ज्यामुळे या पुलाच्या कामाची कंत्राट किंमत २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढत, एकूण कंत्राट किंमत ७७ कोटी एवढी झाली.
(हेही वाचाः मिठी नदीवरी पूल 5 महिन्यांत बांधून पूर्ण)
करारपत्रामुळे थांबले होते काम
या पुलाच्या रेल्वे मार्गावर पहिला गर्डरचे काम मागील वर्षी हाती घेण्यात आले होते. परंतु रेल्वे व महापालिका यांच्यात करारपत्र नसल्याने, हे काम थांबवण्यात आले. त्यानंतर पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करत विधी अधिकाऱ्यांच्या मदतीने करारपत्राचा मसुदा अंतिम करुन दिला. त्यानंतर रेल्वे मार्गावरील पहिला गर्डर टाकण्यात आला.
काय आहे काँग्रेसचा डाव?
दुसरा गर्डर ६ जून रोजी टाकण्यात आला. यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, हा गर्डर टाकण्यास शहराचे पालकमंत्री अस्लम शेख आणि आमदार अमिन पटेल यांनी आक्षेप घेतला. परंतु रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द केल्यास २० कोटी रुपयांचे मोठे नुकसान होणार असल्याने, पूल विभागाच्याा अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत हा दुसरा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले. या गर्डरमुळे पुलाचा पाथवे इमारतींच्या जवळून जात असल्याने, पालकमंत्र्यांनी आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामागे राजकीय कारण असून कोणत्याही परिस्थितीत या पुलाचे बांधकाम वेळेत होऊ नये, यासाठी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची अडवणूक करण्याचा हा काँग्रेसचा डाव असल्याचेही बोलले जात आहे.
(हेही वाचाः २ वर्षांपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील फक्त २२ टक्केच कचऱ्याची विल्हेवाट! )
लवकरच वाहतुकीसाठी खुला
यासाठी सर्व पूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर पाचारण केल्याचेही बोलले जात आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की या पुलावरील दुसरा गर्डर टाकण्याचे काम रविवारी पूर्ण झाल्याने लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होईल.
Join Our WhatsApp Community