आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक लांबणीवर टाका! काँग्रेसची आग्रही मागणी

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुका पुढे ढकलता येतील, अशी मुभा दिली आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाची स्थिती बघून निवडणुका पुढे ढकलण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाला दिली. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिली मुभा

राज्य मंत्रिमंडळाने आपल्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात यावे अशी ठाम भूमिका घेतली आहे. तसेच सध्याची कोरोना स्थिती पाहता राज्यातील नागपूरसह पाच जिल्ह्यांत आणि ३३ पंचायत समित्यांसाठी जाहीर करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंतीही राज्य सरकारने आयोगाला केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै रोजी विषयावर झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निवडणुका पुढे ढकलता येतील, अशी मुभा दिली आहे.

(हेही वाचाः बार मालकांनंतर आता व्यापाऱ्यांकडून ‘वसुली’? )

ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळेल

या निवडणुकीसाठी येत्या १९ जुलैला मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी  जाहीर केलेला कार्यक्रम कोरोना स्थिती पाहता आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुमतीचा विचार करता राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ पुढे ढकलावा, यासाठी आपल्या पातळीवर पाठपुरावा करण्यात यावा, अशी विनंती डॉ. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ही निवडणूक लांबणीवर गेल्यास ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळवून द्यायला मदत होईल, असा विश्वासही त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.

काँग्रेसची आग्रही मागणी

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी काही अटी निश्चित करुन तोवर हे आरक्षण न देता निवडणुका घेण्याचे निर्देश राज्याच्या निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ५ जिल्हा परिषदांच्या ७० जागांसाठी आणि या जिल्हा परिषदांच्याअंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांच्या १३० जागांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर केले. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने ओबीसी आरक्षण कायम रहावे, अशी आग्रही भूमिका घेत ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हीच भूमिका घेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्याचा निर्णयही घेतला. या आशयाचे एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल, अशी घोषणाही सरकारने पावसाळी अधिवेशनात केली.

(हेही वाचाः सरकारी डॉक्टरांनी मागितली आत्महत्येची परवानगी! ठाकरे सरकारप्रति वैद्यकीय क्षेत्रातही नाराजी! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here