नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ७ आमदारांची मते फुटल्याने काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरु झाली आहे. काँग्रेसमध्ये नाराज आमदारांची चर्चा सुरु झाली आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत बोलताना काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी मोठे विधान केले आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत, असे ते म्हणाले.
हिरामण खोसकर काय म्हणाले?
विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी एक दिवस हॉटेलमध्ये आमची सर्वांची चर्चा झाली होती. यावेळी कोणाला मतदान करायचे हे ठरले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहायचे असे ठरले. त्यानंतर साडेसात वाजता सर्व आमदार आले आणि चर्चा सुरु झाली. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे ११ वाजता आले. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली. आम्हाला सात जणांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करायचे आणि सहा जणांना शेकापचे जयंत पाटील यांना मतदान करायचे आणि २५ आमदारांनी प्रज्ञा सातव यांना मतदान करायचे असे सांगण्यात आले होते, पण यामध्ये एक मतदान फुटले. ते मतदान कुणाचे फुटले? मग जयंत पाटील यांना काँग्रेसचे सहा मत द्यायला सांगितले होते. पण काँग्रेसचे (Congress) एकही मत त्यांना पडले नाही. आता त्या सहा लोकांवर कुठलीही कारवाई केली नाही. मग ते सहा आमदार कोण होते, ते त्यांना माहिती नाही का? मागच्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती. त्यानंतर मी वरिष्ठांना सांगितले होते की माझ्याकडून चूक झाली. पण यावेळी मी शपथ घेतली होती की मी चुकणार नाही. पण जे सहा आमदार फुटले त्यांच्यावर कारवाई न करता माझी बदनामी सुरु केली आहे, ही बदनामी वरिष्ठांनी थांबवली पाहिजे, असेही हिरामण खोसकर म्हणाले.
(हेही वाचा Kedarnath Dham एक आणि एकच राहणार; दिल्लीतील मंदिराच्या भूमिपूजनानंतर धामी असे का म्हणाले ?)
आमदार नाराज
आता लहान तोंडी मोठा घास माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांनी घेऊ नये. मात्र, बरेच आमदार नाराज आहेत. मी गरिब माणूस आहे. आम्ही सन्मानाने राहतो. पाच वर्षात आम्ही कुठेही काही बोललो नाहीत. त्यामुळे आता जी काय बदनामी चालू आहे ती बदनामी पक्षश्रेष्ठींनी थांबवली पाहिजे. तसेच गेल्या पाच वर्षात आमदारांची एक मिटिंगही घेतली नाही. फक्त निवडणूक आली की तुम्ही दोन दिवस बोलवायचे आणि वाऱ्यावर सोडून द्यायचे. तीच मिटिंग आधी झाली असती तर मतदानामध्ये फरक पडला असता, असेही हिरामण खोसकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community