लोक बेरोजगार झाले, पण मोदींना विश्वगुरू व्हायचं आहे! मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

आधी तुम्ही देशाचे गुरू तरी बना, अशीही टीका त्यांनी केली आहे.

काँग्रेसच्या योजनेमुळे देशातील 27 टक्के जनता गरिबीतून वर आली, तर मोदी यांच्यामुळे 23 टक्के जनता पुन्हा गरिबीत ढकलली गेली आहे. त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचे उत्पन्न घालवणारे सरकार आहे, असा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. एका वर्षात देशातील 98 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पण मोदी विश्वगुरू व्हायला चालले आहेत, आधी तुम्ही देशाचे गुरू तरी बना, अशीही टीका त्यांनी केली आहे. काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कुठे गेले अच्छे दिन?

भाजप सरकारच्या धोरणांमुळे गरीब जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे. एकीकडे कोविडचं संकट आहे तर दुसरीकडे लोकांना महागाईचा सामना करावा लागतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देशातील लोकांना सुखी ठेवणार आणि याच मुद्यावर त्यांनी मतं घेतली होती. आता ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या अच्छे दिन च्या घोषणेवर हल्ला चढवला आहे.

(हेही वाचाः नानांचा आधी स्वबळाचा नारा, आता थेट मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर टीका!)

इंधनाचा भडका

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता भरडली जात असून, डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होत आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती उतरल्यानंतरही देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांत 38 वेळा हे दर वाढवण्यात आले आहेत. केंद्र सरकार इंधनांच्या किंमतीवर सेस लावत आहे. तो कोणत्याही राज्याला मिळत नाही तर तो केंद्र सरकारच्या तिजोरीत जातो. पेट्रोलवरती कर लावून 25 लाख करोड रुपये केंद्र सरकारने कमवले, मात्र त्यातील महसूल कोणत्याही राज्याला दिला नाही. सिलेंडरवर मिळणारी सबसिडी तीन महिन्यांपासून कोणाला मिळालेली नाही, अशा अनेक मुद्द्यांवरुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कोरोना मृत्यूचा डेटा सरकारकडे नाही

गेल्या सात महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. ते आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घ्यावं यासाठी केंद्र सरकार कोणताही प्रयत्न करत नाही, अशी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. कोरोना रुग्णसंख्या, त्याच्यापासून झालेल्या मृत्यूचा डेटा केंद्र सरकारकडे नाही. याची सत्य माहिती समोर आली तर खरी परिस्थिती देशाला समजेल, असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

(हेही वाचाः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही हवी शिथिलता! निर्बंधांमुळे जनतेत असंतोष!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here