MVA जागावाटप समितीत काँग्रेसकडून १० जणांची वर्णी; सुशीलकुमार शिंदे, विश्वजीत कदमांना डच्चू

163
MVA जागावाटप समितीत काँग्रेसकडून १० जणांची वर्णी; सुशीलकुमार शिंदे, विश्वजीत कदमांना डच्चू

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आल्यामुळे काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह संचारला असला तरी काँग्रेसने स्वतःच्या राजकीय प्रणालीनुसार सावधानतेनेच महाविकास आघाडीतल्या जागावाटपासाठी १० नेत्यांची समिती नेमली आहे. या समितीत काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे आणि विश्वजीत कदम यांचा समावेश केलेला नाही, पण सतेज पाटलांचा समावेश केला आहे. (MVA)

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून फटका

सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीतल्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खेचून घेतली, तरी वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांना पराभूत करणे शिवसेनेला जमले नाही. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी ताकद लावून ही जागा अपक्ष म्हणून विजयी करून दाखवली. विशाल पाटलांनी लगेच विश्वजीत कदमांबरोबर दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे विश्वजीत कदम यांचे काँग्रेसमध्ये स्थान उंचावल्याचे बोलले गेले. त्यांना जागावाटप समिती स्थान मिळेल असे बोलले जात होते. परंतु, प्रत्यक्षात सांगलीतल्या विजयी मेळाव्यात विशाल पाटलांनी विश्वजीत कदम यांचे नाव “भावी मुख्यमंत्री” म्हणून घेतले आणि त्यांना परस्पर मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत ढकलून दिले. परिणामी काँग्रेस सारख्या मुरलेल्या पक्षात त्यांना जागावाटपाच्या समितीतही स्थान राहिले नाही हे दिसून आले. (MVA)

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभेला काँग्रेस पक्षाला तब्बल १३ जागांवर विजय मिळाला. गत २०१९ च्या तुलनेत काँग्रेस १ जागेवरुन १३ जागेवर पोहोचल्याने पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यातही नाना पटोले यांना यश मिळाले. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांही काँग्रेसने नाना पटोले यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या जाणार आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील २८८ विधानसभेच्या जागांवर काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीतील या समन्वयासाठी १० जणांची समिती नेमली तर, मुंबईसाठी या समितीत ३ नेत्यांना स्थान दिले. (MVA)

(हेही वाचा – Thane : पोलिसांच्या ३१६ घरांची योजना लवकरच कार्यान्वित होणार)

महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पुढाकार घेणार आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने या चर्चांसाठी दिल्लीतून वरिष्ठ नेते प्रत्यक्ष दरवेळी येऊ शकत नाहीत. त्यामुळेच, काँग्रेसने महाराष्ट्रात १० नेत्यांची समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये, जुन्या जाणत्या वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर, मुंबईसाठी मुंबईतील तीन प्रमुख नेत्यांचाही या समितीत समावेश केला आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले आहे, तर मुंबईच्या जागा वाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश समितीत आहे. (MVA)

बंटी पाटील इन सुशीलकुमार शिंदे आऊट

पण या समितीमध्ये ज्येष्ठ नेत्यांपैकी सुशीलकुमार शिंदे यांना स्थान देण्यात आले नाही, तर युवा नेत्यांपैकी चर्चेत असलेल्या काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांनाही स्थान मिळाले नाही. मात्र, कोल्हापूरच्या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या माजी मंत्री सतेज पाटील यांना १० जणांच्या समितीत स्थान मिळाले आहे. (MVA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.