आदित्य ठाकरेंच्या प्रशासकीय कौशल्यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादी हतबल!

आदित्य ठाकरेंच्या प्रशासकीय कौशल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी हतबल झाले. म्हणून आदित्य ठाकरेंच्या जवळील अधिकाऱ्यांच्या बदली करून शह देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे.

108

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्रीपद युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे भूषवत आहेत. या सरकारमध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनुभवी मंत्री असले, तरी त्यांच्या तुलनेत उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नवखे असूनही उत्तमरित्या प्रशासन हाताळत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासकीय कामाचे कौशल्य नसतानाही नवख्या असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सनदी अधिकाऱ्यांशी टायमिंग जुळवून घेतले आहे. आदित्य ठाकरे यांचे हे प्रशासकीय कौशल्य पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी मंत्र्यांच्या उरात धडधड सुरु झाली आहे.

सनदी अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंशी मैत्री करावीशी वाटते!

राज्यातील महाविकास आघाडीत सर्वात तरुण आणि अननुभवी मंत्री आदित्य ठाकरेंची ओळख आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे आदिती तटकरे याही प्रथमच आमदार बनत मंत्री बनलेल्यांपैकी एक आहे. परंतु आदित्य ठाकरे यांची काम करण्याची पध्दती ही सर्व सनदी अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारी ठरत आहे. सर्व सनदी अधिकाऱ्यांना सोबत घेवून ते काम करत असल्याने वरिष्ठांपासून ते सर्वच सनदी अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंशी मैत्री करावीशी वाटते.

(हेही वाचा : फक्त घोषणाच नाही, काँग्रेसची स्वबळासाठी तयारीही सुरू)

अधिकाऱ्यांना आदित्य यांनी विश्वासात घेतले! 

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, आशुतोष सलिल यांच्यासह सर्व विभागीय सहायक आयुक्त, उपायुक्तांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आदित्य हे मंत्री असले तरी ते वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत ते आधी सर्व विषय समजूत घेतात. आपले म्हणणे अधिकारवाणीने न लादता समोरच्यांकडून प्रशासकीय बाबी समजून घेतात. एवढेच नाही तर आदित्य यांच्याशी बोलतांना एक नम्रपणा आणि विश्वास अधिकाऱ्यांना जाणवत असतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे काम कोणताही अधिकारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या उरात धडकी भरत आहे.

म्हणून अधिकाऱ्यांच्या होतायेत बदल्या!

काही दिवसांपूर्वी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले संजीव जयस्वाल यांची बदली याच सूडबुध्दीने झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंच्या प्रशासकीय कौशल्यामुळे या दोन्ही पक्षातील मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी हतबल ठरत असून त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या जवळील अधिकाऱ्यांच्या बदली करून शह देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वी आदित्य ठाकरे हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच इतर सचिवांना भेटत असत. त्यामुळे तेव्हापासूनच्या ओळखीचा फायदा आज आदित्य यांना मंत्री म्हणून काम करताना होत आहे. विशेष म्हणजे या मैत्रीमुळेच हे अधिकारी आदित्य ठाकरेंना मार्गदर्शन करत असतात, असेही पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा : १५ दिवसांत १७ लाख विद्यार्थ्यांचा निकाल तयार होणार! एसएससी बोर्ड विश्वविक्रम करणार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.