महाविकास आघाडीतील वादविवादांवर ‘समन्वय समिती’चा उतारा!

शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या समितीत असणार आहेत.

79

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला दीड वर्षांहून अधिक काळ झाला असला, तरी गोंधळ कमी होताना दिसत नाही. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकमेकांचे नेते फोडून पक्षात प्रवेश देत आहेत. या पक्ष प्रवेशामुळे देखील वादविवाद टोकाला पोहचला होता. त्याच बरोबर एकमेकांपेक्षा जास्त ताकदवान होण्याची ईर्षा वाढल्याने या तिन्ही पक्षांमध्ये आता सारखे खटके उडू लागले आहेत. यावर आता तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी यातून मार्ग काढला आहे. तिन्ही पक्षांनी वादविवाद मिटवण्यासाठी संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

समितीची जबाबदारी ‘या’ तिघांवर असणार!

प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन केली आहे. यामध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही समिती काम करणार आहे. ही समिती एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही हवी शिथिलता! निर्बंधांमुळे जनतेत असंतोष!)

म्हणून काढला हा रामबाण उपाय!

कोरोनामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून, पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमांना देखील जोर आला आहे. त्यातच एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हे सर्व प्रकार रोखण्यासाठीच महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन केली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या समितीत असणार असून, हे तिन्ही नेते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात कार्यकर्त्यांना प्रवेश देतांना एकमेकांना विश्वासात घेणार आहेत. एकमेकांना विश्वासात घेऊनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

सरनाईकांच्या लेटरबॉम्बमुळे तोडगा काढला!

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नुकतेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला होता. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. अखेर ही अस्वस्था रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.