सहायक आयुक्तांच्या बदलीवरून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाराज

ज्या सहायक आयुक्तांची तीन वर्षेही पूर्ण झाली नाहीत आणि ज्यांनी विभागात चांगले काम केले, अशा विभागांच्या सहायक आयुक्तांच्या बदली रद्द कराव्यात, या मागणीसाठी गेलेल्या काही नगरसेवकांना आयुक्तांनी चक्क बाहेरचा रस्ता दाखवला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी मुंबईत महापालिकेत जणू काही आपला करारनामा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी झाल्याची समजूत करून घेत शिवसेनेचा महापालिकेत एक हाती कारभार सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांच्या बदलीत सत्ताधारी शिवसेनेचा हात आहे. ज्या सहायक आयुक्तांची तीन वर्षेही पूर्ण झाली नाहीत आणि ज्यांनी विभागात चांगले काम केले, अशा विभागांच्या सहायक आयुक्तांच्या बदली रद्द कराव्यात, या मागणीसाठी गेलेल्या काही नगरसेवकांना आयुक्तांनी चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. या बदल्या एकप्रकारे मंत्रालयातून आलेल्या यादीनुसारच झाल्या असून त्या रद्द करायच्या असतील तर तुम्ही तिथून परवानगी आणा, असे उत्तर आयुक्तांनी दिल्याचे बोलले जात आहे. आयुक्तांनी एकप्रकारे मंत्रालयाकडे बोट दाखवल्याने सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक चडीचूप झाले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

म्हणून विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता!

मुंबईतील महापालिका विभागीय सहायक आयुक्तांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्या आहेत. या बदल्या आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला अगदी सहा ते सात महिने राहिले असताना तसेच संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता असताना बदलले गेले. त्यामुळे विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही विभागातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागील आठवड्यात आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. खरे तर सुरुवातीला आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाची आठवण करून देत आपण सर्वांना भेटू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर दोघा – तिघांना भेटण्याची परवानगी दिली. त्यात तिन्ही पक्षांचे एकेक नगरसेवक होते. या भेटीत ईशान्य मुंबईतील या नगरसेवकांनी आयुक्तांना, आमच्या विभागातील सहायक आयुक्तांची बदली रद्द करता येईल का ते पाहावे. कारण त्यांचा तीन वर्षांचा कालावधीही पूर्ण झाला नाही. शिवाय त्या विभागात कोविड रुग्ण संख्या वाढत असताना त्यांनी ती योग्यप्रकारे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा : तुमचं शहर बुडणार आहे… नासाने दिला धोक्याचा इशारा)

आयुक्तांना हाताशी धरून सत्ताधारी पक्ष निर्णय घेतात

पुढील सहा महिन्यांत निवडणुका येऊ घातल्या आहेत. जर त्यांची बदली झाली तर विभागातील कामे झपाट्याने होतील. यावर आयुक्तांनी, ज्या बदल्या झाल्या त्या ‘वरून’ आलेल्या निर्देशानुसार केलेल्या आहेत. जर आपल्याला ते रद्द करायचे असेल तर वरून परवानगी आणा, करून देतो असे उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे. आयुक्तांच्या या उत्तरानंतर हतबलतेने ते नगरसेवक तिथून बाहेर पडले. प्रत्येक विभागात प्रत्येक पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याचे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सत्ताधारी पक्षाने इतर पक्षाच्या नेत्यांना विचारात घेतले पाहिजे. पण जर मुंबईत परस्पर असे निर्णय आयुक्तांना हाताशी धरून सत्ताधारी पक्ष करत असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा सूर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमधून उमटू लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here