राऊतांच्या विधानावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत नाराजी

166

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसायची या बंडखोर आमदारांची तयारी नसून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना भावनिक आवाहन केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, तुम्ही मुंबईत परत या, असे सांगितले.

राऊतांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीत नाराजीचे वातावरण आहे. असे वक्तव्य करण्याआधी राऊत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करायला हवी होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः ‘मविआ’तून बाहेर पडायला ‘शिवसेना’ तयार, राऊतांंनी सांगितले…)

आमची तयारी आहे

शिवसेना हा स्वतंत्र पक्षा आहे. सरकारमध्ये राहायचं की नाही याचा निर्णय ते घेऊ शकतात. पण सरकारमधील घटक पक्षांशी त्यांनी बोलायला हवे होते. कोणी बाहेर पडल आणि सरकार अडचणीत आलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला त्याची काळजी नाही. विरोधी पक्षात बसण्याची सवय राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. सत्ता येते-जाते जनतेची सेवा महत्वाची असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेत्यांची बैठक

संजय राऊत यांच्या या विधानानंतर काँग्रेस पक्षातही नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत संजय राऊत यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी बंगला सोडला, उपमुख्यमंत्र्यांनी गाडी सोडली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.