सातव यांच्या जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी! भाजपचे ‘हे’ आहेत उमेदवार

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, मुकूल वासनिक आणि मिलिंद देवरा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती.

काँग्रेस नेते व महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या खासदारकीच्या जागेसाठी लवकरच निवडणूक होत असून, काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावाची या जागेसाठी घोषणा करण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, मुकूल वासनिक आणि मिलिंद देवरा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती. मात्र, अखेर रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

सातवांच्या पत्नीला हे स्थान?

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत काँग्रेसकडून रजनी पाटील यांचे नाव देण्यात आले होते. मात्र आता त्यांना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रजनी पाटील यांच्या जागेवर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आले.

(हेही वाचाः लखोबा लोखंडेवरुन शेलारांची सेनेवर टीका)

भाजपकडून संजय उपाध्याय

भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यसभा भाजप लढणार आहे, मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.

(हेही वाचाः राज्य अराजकतेकडे… शेलारांचा ठाकरे सरकारवर आरोप)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here