वंदना बर्वे
लोकसभेच्या निवडणुकीतील रणनिती ठरविण्यासाठी भाजपविरोधी पक्ष शुक्रवारी, २३ जून रोजी पाटण्यात एकजूट होत असतानाच काँग्रेस पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अवस्था केविलवाण्यासारखी करून सोडली आहे. केंद्राचा अध्यादेश हाणून पाडण्यासाठी केजरीवाल काँग्रेसकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. परंतु, केजरीवाल यांना मदत करायची नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
दिल्लीचे उपराज्यपाल हेच दिल्लीतील ब्युरोक्रेसीचे बॉस असतील असा अध्यादेश केंद्र सरकारने काढला आहे. विरोधी पक्षांनी राज्यसभेत या अध्यादेशाच्या विरोधात मतदान करावे, अशी विनंती आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. यासाठी त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेवून मदत मागितली आहे. परंतु, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केजरीवाल यांना अद्याप भेटीची वेळ दिलेली नाही. केजरीवाल मागील कितीतरी दिवसांपासून खर्गे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागत आहेत. मात्र, केजरीवाल यांची डाळ काही शिजत नाही आहे.
(हेही वाचा – भाजपकडून बारामतीमध्येच पवारांना घेरणार?)
भाजप लोकसभेत बहुमतात आहे. मात्र, राज्यसभेत अल्पमतात आहे. अशात, अध्यादेशाविरूध्द मतदान झाले तर दिल्लीतील ब्युरोक्रेसीला उपराज्यपालांच्या हातात देण्याचा केंद्राचा निर्णय रद्द होईल. अन्यथा, उपराज्यपाल हेच दिल्लीचे बॉस असतील. राज्यसभेत काँग्रेसचे ३१ खासदार आहेत. अशात, काँग्रेसची सोबत मिळाली तर अध्यादेश रद्द होवू शकतो आणि केजरीवाल पुन्हा एकदा ब्युरोक्रेसीचे बॉस होवू शकतात. मात्र, काँग्रेस केजरीवाल यांना भाव देत नाही आहे.
अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला राजी करण्यासाठी नवा डाव खेळला आहे. पाटण्यात शुक्रवारी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत अध्यादेश हाणून पाडण्याच्या मुद्यापासून चर्चेला सुरुवात व्हावी, अशाप्रकारची विनंती केजरीवाल यांनी सर्व पक्षांना पत्र लिहून केली आहे. यावर एकाही पक्षाने अद्याप सकारात्मक भूमिका दर्शविलेली नाही. विरोधी पक्षांच्या माध्यमातून काँग्रेसवर दबाव टाकण्याचा केजरीवाल यांचा हा डाव आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम आदमी पक्षाला मदत करायची नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community