मालाड पश्चिममधील लिबर्टी गार्डन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील शिल्प हे तेथील रस्ते कामात बाधित झाल्याने त्याच रस्त्यावरील चौकात महापालिकेच्या संमतीने उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वीर सावरकरांचा पुतळा बसवण्यात आला आहे. परंतु, हा पुतळा अनधिकृत असल्याचा दावा काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. त्याला भाजपाचे पदाधिकारी सुनील कोळी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने कायमच वीर सावरकरांचा द्वेष केला असून विरोध करणारा माणूस हा मराठी असल्याने ती व्यक्ती खरोखरच हिंदु आहे का याचीच शंका येते असा पलटवार कोळी यांनी केला आहे.
मालाड पश्चिम येथील लिबर्टी गार्डन येथे बसवलेला स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा पुतळा अनधिकृत असून त्याबाबत कोणतीही माहिती मुंबई महापालिकेच्या पी उत्तर विभागाकडे नाही. त्यामुळे हा पुतळा हटवण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव संतोष चिकणे यांनी केली आहे. विशेष म्हणजे लिबर्टी गार्डन येथील चौकाचे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असे नामकरण करून तेथे त्यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदार व केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते झाले होते.
(हेही वाचा Guardian Minister : पालकमंत्री पदावरून इतका रुसवाफुगवा का? काय अधिकार असतात पालकमंत्र्यांचे? जाणून घ्या…)
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर आधारीत भित्तीशिल्प (म्युरल) हे तत्कालिन शिवसेनेचे नगरसेवक मधुकर राऊत यांच्या प्रयत्नाने बनवण्यात आले होते. परंतु येथील रस्ता रुंदीकरणामध्ये हे भित्तीशिल्प बाधित होत असल्याने तत्कालिन उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करून देत महापालिकेच्या संमतीने या पुतळ्याचे बांधकाम केले. या पुतळ्याचे अनावरण खासदार व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते करण्यात आले असल्याचे भाजपाचे मालाड विधानसभा अध्यक्ष सुनील कोळी यांनी सांगितले.
याठिकाणचे भित्तीशिल्प रस्ते रुंदीकरणामुळे बाधित होत असल्याने त्याठिकाणी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा पुतळा उभारला जावा अशा प्रकारची संकल्पना मांडली गेली. स्थानिक भाजपाच्या माजी नगरसेविका योगीता सुनील कोळी यांनी महापालिकेकडे याबाबत मागणीबाबतचे पत्रही दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत वीर सावरकरांचा पुतळा उभारला. मात्र, काँग्रेसला कायमच वीर सावरकर यांच्या नावाची ऍलर्जी आहे. ज्यांनी विरोध केला ती व्यक्ती स्थानिक आमदार अस्लम शेख यांचे समर्थक आहे. आमदारांनी त्या व्यक्तीला पुढे करून हा विरोध केला आहे. परंतु, ही मराठी व्यक्ती आज वीर सावरकरांनी केलेल्या त्यागाला विसरली असून विरोध करणारा हा पदाधिकारी खरोखरच हिंदू आहे का, असा प्रश्न निश्चितच आम्हाला पडतो असा टोला कोळी यांनी मारला.
Join Our WhatsApp Community