राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येऊन आता दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी या महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे समोर आले होते. यामध्ये सर्वाधिक नाराजी ही काँग्रेसच्या मंत्र्यांची जरी पहायला मिळाली असली, तरी काँग्रेसचे मंत्री मात्र सरकारमध्ये खूश आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवर मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. महाविकास आघाडीमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना कवडीचीही किंमत नसल्याची भावना काही काँग्रेसच्या नाराज माजी आमदार, काही जिल्हाध्यक्ष आणि काही कार्यकर्त्यांनी हिंदुस्थान पोस्ट सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
कार्यकर्त्यांनाचा आता मंत्र्यांचे अस्तित्व दिसेना!
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांसह काही नेत्यांचा समावेश आहे. पण या नेत्यांचे सरकारमध्ये अस्तित्वच दिसत नसल्याचे पहायला मिळत आहे. याचमुळे सध्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते वरचढ ठरत असल्याची भावना, काही नाराज कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. आज सरकारमध्ये जे काँग्रेसचे मंत्री आहेत ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आहेत का?, असा सवाल देखील कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
(हेही वाचाः सत्तेत असूनही काँग्रेस अनेकदा नाराज… कशी दूर होणार नाराजी?)
अशोक चव्हाण, थोरतांवर सर्वाधिक नाराजी
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येण्यासाठी याच दोन नेत्यांचा महत्वाचा वाटा होता. पण सत्तेत येऊन काँग्रेसच्या हाती काही लागले का? आज आम्ही सत्तेत आहोत, पण आम्हाला स्थानिक पातळीवर कवडीची किंमत नाही. उलट ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा पालकमंत्री आहे त्या ठिकाणी काँग्रेसला पद्धतशीरपणे डावलले जाते, असे एका जिल्हाध्यक्षाने खासगीत बोलताना सांगत, थेट अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे हे नेतेही सध्या पक्षापासून दूर
एकीकडे कार्यकर्ते नाराज असताना काँग्रेसचे काही माजी खासदार, माजी आमदार देखील सध्या पक्षापासून दूर राहणे पसंत करत आहेत. यामध्ये माजी खासदार प्रिया दत्त, मिलिंद देवरा, माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, जनार्दन चांदुरकर यांचा उल्लेख करता येईल. या सर्व नेत्यांना पक्षात एक वेगळे स्थान होते. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, हे नेते जणूकाही अडगळीत पडले की काय, असा प्रश्न आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी तर अनेकदा महाविकास आघाडीवरच टीका केली होती. तसेच ते नेहमीच सरकारच्या चुकांवर बोट ठेवत आपली नाराजी बोलून दाखवत आहेत.
(हेही वाचाः रुसवे-फुगवे विसरून काँग्रेसला लागली महामंडळाची घाई!)
मी मागील 25 वर्षांपासून काँग्रेससोबत जोडला गेलो आहे. मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष देखील होतो. पण आता मागील वर्षभरात जे काय सुरू आहे, ते न पटणारे आहे. आज आमच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वरचढ झाले आहेत.
-माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस
Join Our WhatsApp Communityशिवसेने सारख्या पक्षासोबत न जाता भाजपला दूर ठेवण्यासाठी बाहेरुन पाठिंबा देणे हे पक्षाच्या हिताचे होते. पण आज सत्तेत जाऊनही कॉंग्रेसच्या मंत्र्यांना किंमत नाही.
-माजी काँग्रेस आमदार