पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली… सोनिया, राहुल गांधी येणार मुंबईत

165

पालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्ष कामाला लागले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बऱ्याचवेळा काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. आता तर काँग्रेसच्या हायकमांडने दंड थोपटले असून, चक्क राहुल गांधी आणि सोनिया गांधी मुंबईत येणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पालिका निवडणुकीवर चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, 28 डिसेंबर या काँग्रेसच्या स्थापना दिनी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभा घेणार असल्याची माहिती एच.के.पाटील यांनी यावेळी दिली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ५० मिनिटे चर्चा झाली असून, जाहीरनाम्यासह निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांविषयी यावेळी चर्चा झाली. महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर युती वा आघाडी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली नाही, तर स्थानिक पातळीवरील समीकरणे पाहून स्थानिक नेतेच त्यासंदर्भात निर्णय घेतील. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पुन्हा एकदा लवकरच बैठक घेतली जाणार आहे.

(हेही वाचाः रावतेंची ‘शिवाई’ परबांच्या काळात भंगारात)

केंद्राचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष

अतिवृष्टी व महापूराने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. परंतु या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धाऊन आले नाही. अजूनही केंद्र सरकारची कुठलीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही. एनडीआरफची मदतही मिळालेली नाही. महाराष्ट्रावर आपत्ती कोसळली असताना पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहणीसुद्धा केली नाही हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री कुठे होते? असा सवालही एच. के. पाटील यांनी विचारला.

पूरग्रस्त काळात काँग्रेसची मदत

महाराष्ट्रावर आलेल्या आपत्तीवेळी काँग्रेस पक्षाने मोठे मदतकार्य केले असून, संकटात मदतीला धाऊन जाण्याची परंपरा काँग्रेस पक्षाने कायम राखली आहे. आजही मुंबई काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त कोकणवासीयांसाठी मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. आपत्तीग्रस्तांना काँग्रेसने केलेल्या या मदतकार्याची दखल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने घेतली असून, संकटकाळात महाराष्ट्र काँग्रेस व मंबई काँग्रेसने उत्तम काम केल्याचे पाटील म्हणाले.

(हेही वाचाः खेलरत्न पुरस्कारावरून काँग्रेसचा रडीचा ‘डाव’! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.