आजपासून तुमचे नाव मल्लिकार्जुन बाहुले

141

टिव्ही, सिनेमा या क्षेत्रांमध्ये क्रांती घडल्यानंतर नाटक हे क्षेत्र जरा मागे पडले आहे. पूर्वी नाटक बघायला पुष्कळ गर्दी व्हायची. मनोरंजनाचा दुसरा पर्याय सहसा उपलब्ध नव्हता. पण ही उणीव कॉंग्रेस पक्षाने भरुन काढण्याचा हट्ट धरला आहे. कॉंग्रेसमध्ये रोज नवीन नाटकाचे प्रयोग घडत आहेत. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली भारत जोडो यात्रा हे एक अतिशय सुंदर नाटक सुरु आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक हे एक मनोरंजनात्मक महानाट्य नुकतेच संपन्न झाले आहे.

( हेही वाचा : निवडणुकीतून माघार; हा कोणता मास्टर स्ट्रोक आहे?)

आता या महानाट्यावर प्रतिक्रिया येऊ लागली आहे. नाटक संपल्यानंतर जसे प्रेक्षक कलाकारांना भेटून त्यांचे अभिनंदन करतात तसे आता कॉंग्रेसी मल्लिकार्जून खर्गे यांचे अभिनंदन करत सुटले आहे. कॉंग्रेसींना हे नाटक इतके आवडले आहे की प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांना असे वाटू लागले आहे की, कॉंग्रेस हा लोकशाहीने चालणारा पक्ष असून कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष कार्यकर्ते निवडतात.

खरं पाहता, कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणा किंवा मालक म्हणा ते गांधी कुटुंब आहे. मग आता लोकांना प्रश्न पडला असेल की मल्लिकार्जून खर्गे कोण आहेत? खर्गे हे नवे मनमोहनसिंह आहेत. सोनिया गांधी यांना देशभरातून विरोध झाला म्हणून त्यांनी नाइलाजाने आपल्या मर्जीतले डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान केले. डॉ. मनमोहन सिंह यांच्यासारखे बुद्धिमान नेते गांधी कुटुंबामुळे बदनाम झाले. कसाबच्या हल्ल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांना सडेतोड उत्तर देता आले नाही, भारताने मार खाल्ला. आज सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करुन पाकिस्तानची आपण कोंडी केली. तशी कोंडी सिंह यांना करता आली असती. पण कदाचित गांधी कुटुंबाच्या दबावामुळे त्यांना हे करता आले नाही.

आजची परिस्थिती देखील वेगळी नाही. गांधी कुटुंबाला विरोध होऊ लागला, पराभवाचं खापर त्यांच्यावर पडू लागलं म्हणून त्यांनी मल्लिकार्जून खर्गे यांना अध्यपदाच्या खुर्चीवर बसवलं आहे. शशी थरुर कदाचित गांधींचं ऐकणार्‍यातले नव्हते म्हणून त्यांचा विजय होऊ शकला नाही. केवळ दाखवण्यासाठी थरुर उभे होते. आता मल्लिकार्जून खर्गे जरी अध्यक्ष झाले असले तरी सगळी सूत्र माय-लेकाच्याच हातात आहेत. राहुल गांधी यांच्या बरोबर कॉंग्रेसी भारत जोडो यात्रा काढत आहेत. पण गुजरातची महत्वाची निवडणूक आली आहे, त्याकडे यांचं सपशेल दुर्लक्ष झालं आहे.

त्यामुळे खर्गे यांच्या अध्यक्ष होण्याने काही फरक पडणार नाही. डॉ. मनमोहन सिंह हे सोनिया गांधींच्या हातचे बाहुले होते तसे आता मल्लिकार्जून खर्गे बाहुले आहेत. कॉंग्रेसमधील हा पपेट शो लवकर संपणारा नाही. त्यांना एका एकनाथ शिंदेची गरज आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.