काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच खर्गे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटी संपुष्टात आणली असून एका नव्या समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये एकूण 47 जणांचा समावेश असून त्यात सोनिया गांधी,राहुल गांधी,मनमोहन सिंग,ए के अंटोनी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मात्र शशी थरुर यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
काँग्रेसची नवीन समिती
काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये एकूण 23 जणांचा समावेश होता. पण खर्गे यांनी तयार केलेल्या समितीत 47 काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या घटनेचा विचार करुन खर्गे यांनी या नव्या समितीची स्थापना केली आहे. काँग्रेसच्या घटनेतील कलम XV (b) नुसार ही समिती स्थापन करण्यात आल्याचे काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे. ही समिती आता काँग्रेस वर्किंग कमिटीच्या जागी काम करणार आहे.
(हेही वाचाः सरकारमधील नाराज आमदार माझ्या संपर्कात, मी धमाका करणार! बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा)
यांचा आहे समावेश
या समितीमध्ये काँग्रेसमधील अनेक मोठ्या चेह-यांना स्थान देण्यात आले आहे. या समितीत अभिषेक मनू सिंघवी,आनंद शर्मा,रणदीप सुरजेवाला,अजय माकन,दिग्विजय सिंह,अंबिका सोनी,हरिष रावत,जयराम रमेश,के.सी.वेणुगोपाल,मीरा कुमार,पी.एल.पुनिया,प्रमोद तिवारी,सलमान खुर्शिद,राजीव शुक्ला यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील खर्गेंचे प्रतिस्पर्धी शशी थरुर यांना मात्र या समितीतून वगळण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community