महाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार होईल. सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल आणि मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही, असे सांगताना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली. महापुरुषांचा अपमान संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपाला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले. नुकतेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी मोठा भाऊ झाला आहे, असे सांगत राष्ट्रवादीला जागा जास्त मिळाव्यात असे सूचित केले होते, त्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी विरोध केला होता, आता काँग्रेसने नवा फॉर्म्युला मांडला आहे.
महविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन प्रमुख पक्षांनी आगामी लोकसभा आणि त्यानंतर होऊ घातलेली विधानसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात जागावाटपाचा मुद्दा अतिशय कळीचा आहे. महाविकास आघाडीत मोठाभाऊ कोण यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर ठाकरे गटाने लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपाची प्रत्यक्ष चर्चा सुरु होण्यापूर्वी आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले यांनी जागावाटप मेरिटवर निर्णय होईल, असे सांगितले.
(हेही वाचा PM Narendra Modi : पंतप्रधान कार्यालयात कामाला असल्याची थाप मारून फसवणूक करणाऱ्या एकाला अटक)
Join Our WhatsApp Community