काँग्रेस खासदार रजनी अशोकराव पाटील यांना शुक्रवारी, १० फेब्रुवारी रोजी संसदेत गैरवर्तन करण्याच्या कारणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी सभागृहातून एक व्हिडिओ ट्विट केल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
विशेषाधिकार समिती या प्रकरणाची चौकशी करणार असून जोपर्यंत समिती अहवाल देत नाही तोपर्यंत पाटील यांना निलंबित केले जाईल. संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी हे प्रकरण कोणत्याही बाहेरील एजन्सीकडे सोपवले जाणार नाही, असे धनखड म्हणाले. रजनी पाटील या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू आहेत. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता. सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही पाटील यांची ओळख होती. युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने एका महिला नेत्याला संधी दिली होती. यापूर्वी त्या ११ व्या लोकसभेत बीडमधून खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या.
(हेही वाचा Cow Hug Day : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गायीला अलिंगण देण्याचे आवाहन केंद्राने घेतले मागे)
Join Our WhatsApp Community