विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी स्वपक्षातूनच (Congress) नाराजीचा सूर उमटू लागल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे संकेत मिळत आहेत. येत्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अनुभवी नेत्याच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाऊ शकते. प्राप्त परिस्थितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
(हेही वाचा – Manipur Violence : अमित शाह मणिपूर दौऱ्यावर)
मागच्या जूनमध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत कलह उफाळून आला, पक्षात वरिष्ठ नेत्यांमध्येच एकोपा नाही, असे चित्र निर्माण झाले. त्यात भर म्हणून नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले विरुद्ध विदर्भातील काँग्रेस नेते, असे वादही चव्हाट्यावर आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे वाद पुन्हा उफाळून येऊ नयेत, यासाठी नेतृत्वबदल केला जावा, असे हायकमांडचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील काही नेत्यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या (Congress) सध्याच्या रचनेत काही फेरबदल करून प्रमुख नेत्यांवर नव्या जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात चर्चा झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा कर्नाटक मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे ती जबाबदारी नव्या नेत्याकडे देण्याबाबतही चर्चा झाल्याचे कळते.
हेही पहा –
‘ही’ नावे चर्चेत
नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अशोक चव्हाण यांच्यासह यशोमती ठाकूर आणि सतेज पाटील यांची नावे चर्चेत आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी काँग्रेसला (Congress) चांगले यश मिळवून दिले होते. तसेच यापूर्वीही त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते काँग्रेसमधील जनाधार असलेले सर्वात मोठे नेते मानले जातात. त्यामुळे या शर्यतीत चव्हाण यांचे पारडे जड मानले जात आहे.
Join Our WhatsApp Community