सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर उफाळून आलेला थोरात-पटोले यांच्यातील वाद शमून, आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाली आहे. त्यामुळे हायकमांडने मोकळा श्वास घेतला असला, तरी काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे.
तेव्हापासून थोरात आणि पटोले यांच्यात सुप्त संघर्ष
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर बाळासाहेब थोरात महसूलमंत्री बनले; पण त्यावेळी काँग्रेसने त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद काढून नाना पटोले यांना दिले. तेव्हापासून थोरात आणि पटोले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला. प्रदेश काँग्रेसच्या बैठकांमध्ये तो अधूनमधून दिसून यायचा. मात्र, सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर हा संघर्ष उघडपणे उफाळून आला. ‘मला पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नाही’, असे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पाठवून थोरात यांनी पटोलेंविरोधात दंड थोपटले. शिवाय कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देवून दबावतंत्राचाही अवलंब केला.
शिलेदार मध्यस्थीसाठी पाठवला
या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र झाल्यास प्रदेश काँग्रेसची दोन शकले होतील, ही शक्यता ध्यानात घेऊन हायकमांडने वेळीच आपला शिलेदार मध्यस्थीसाठी पाठवला. प्रभारी एच.के. पाटील यांची शिष्टाई कामास आली आणि बाळासाहेब थोरतांसह नाना पटोले यांनी आपली पदे कायम ठेवण्यासाठी दिलजमाई केली. मात्र, यामुळे काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होऊन ते पायउतार व्हावेत, अशी इच्छा काँग्रेसमधील काही नेते बाळगून होते. त्यातल्या त्यात प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक होती. विदर्भातील सुनील केदार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत हे उघडपणे पटोले यांच्या विरोधात होते. यातील काहींना प्रदेशाध्यक्ष पदाची स्वप्नेही पडू लागली होती. दुसरीकडे अशोक चव्हाण गटनेते पदासाठी इच्छुक होते. बाळासाहेब थोरात यांची विकेट जाईल आणि आपला नंबर लागेल, अशी अशा त्यांना होती. मात्र, पक्षातील सहकाऱ्यांच्या सुप्त इच्छा पाहता, आपला कधीही गेम होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन थोरात आणि पटोलें यांनी संघर्षाची तलवार म्यान केल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community