Congress : काँग्रेसने सट्टेबाजीचा पैसा छत्तीसगडच्या निवडणुकीत वापरला; प्रवीण दरेकरांचा आरोप

118

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सत्तेत राहून सट्टेबाजीचा मोठा खेळ खेळत त्यातून कमावलेला पैसा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वापरला आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. सट्टेबाजी ॲपचे प्रवर्तक हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना नियमित पैसे देत असल्याची धक्कादायक माहिती काल ईडीच्या तपासात उघड झाली. या घोटाळ्याला कॉंग्रेस (Congress) च्या बघेल सरकारचा पाठिंबा आहे असे भाजपा पहिल्यापासून सांगत होती, आता हे बिंग फुटले असून बघेल याना एकूण ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचेही आमदार दरेकर यांनी नमूद केले.

विकासाच्या बाता करणा-या कॉंग्रेस (Congress) च्या बघेल सरकारचा विकासाचा बुरखा टराटरा फाटला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम छत्तीसगडमध्ये पोहचवली जात असल्याची गुप्त माहिती अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी  हॉटेल ट्रायटन आणि अन्य ठिकाणी झडती घेतली. तसेच काँग्रेस (Congress) पक्षाच्या निवडणूक खर्चासाठी मोठी रक्कम पोहोचवण्यासाठी संयुक्त अरब अमीरातीतून पाठवलेला कॅश कुरिअर असीम दास याला अटक करून त्याच्या घरातून ५.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बघेल यांना द्यायची होती असे दासने मान्य केल्याचेही ‘ईडी’ने म्हटले आहे. यावरून सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साईड बिझनेस असून बघेल यांनी छत्तीसगडच्या विकासाला बेटींगवर पणाला लावले अशी टीकाही आमदार दरेकर यांनी केली.

(हेही वाचा : Lalit Patil ला पळून जाण्यासंबंधी केलेले आरोप ससूनच्या अधिष्ठातांनी फेटाळले; म्हणाले…)

‘ईडी’ने महादेव ॲपच्या काही बेनामी बँक खात्यांतून १५.५९ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम गोठवली आहे. यापूर्वीच ४ आरोपींना अटक केली आहे आणि ४५० कोटींहून अधिक रुपयांची गुन्हेगारी रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून मित्र व सहकारी यांच्या मदतीने भारतभर हजारो पॅनल चालवत आहेत आणि त्यांनी त्यातून हजारो कोटी रुपये कमावले आहेत, असेही आमदार दरेकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.