काँग्रेस (Congress) पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या 8 आमदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच कारवाईचा इशारा दिलेला आहे.
काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीची 19 जुलैला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याचे दिसून आले होते.
(हेही वाचा Bhushan Gavai : राज्यातील न्यायदानाची गती वाढणार; ऑनलाईन सुनावणी कक्ष व अभिलेख कक्षाचे उद्घाटन)
निवडक नेत्यांची बैठक
विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केले आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीनंतर फुटीर आमदारांवर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखली जाणार असल्याची माहिती आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची (Congress) 8 मते फुटल्याचे दिसून आले. यापैकी काही आमदारांनी भाजपाला तर काहींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केल्याचे पाहायला मिळाले.
तर पक्षातला कचरा तरी निघून जाईल फुटलेल्या आमदारांवर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले, महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने (Congress) विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community