महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा, बैठकीत निर्णय

महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आघाडीतील शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार का याची चर्चा होत असतानाच आता काँग्रेसने एक मोठे पाऊल उचलले आहे.

काँग्रेसने पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सुद्धा काँग्रेस स्वबळाचा नारा देणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचाः ‘शिवाजी पार्कवरुन सोनिया गांधी आणि पवारांचे विचार पुढे नेणे हा बाळासाहेबांचा अपमान’, शिंदे गटाचा ठाकरेंवर निशाणा)

पुणे काँग्रेसच्या बैठकीत निर्णय

पुण्यातील काँग्रेस भवनात शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यातील नेत्यांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढल्यास काँग्रेसमधील नेते नाराज होण्याची शक्यता असल्याचे सांगत हा पुणे काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसची नाराजी

राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील धुसफूस समोर येऊ लागली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मते फुटल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सुद्धा दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचा विचार न केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते.

(हेही वाचाः राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता: धरिला कॉंग्रेसचा बापू…)

हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीसोबत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट संकेत यावेळी दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here