‘भारत बंद’ साठी काँग्रेस उतरणार रस्त्यावर!

मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटना व डाव्या पक्षांनी सोमवारी, २७ सप्टेंबरला पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्ष सक्रीय सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

74

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटना व डाव्या पक्षांनी सोमवारी, २७ सप्टेंबरला पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्ष सक्रीय सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काळ्या कृषी कायद्याने मोदी सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे!

अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी वर्षभरापासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात जवळपास ५०० शेतकऱ्यांचे निधन झाले, परंतु केंद्रातील कुंभकर्णी सरकारला मात्र या शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही. या काळ्या कृषी कायद्याने देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करुन त्याला भांडवलदाराचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क व अधिकार काढून घेतले आहेत. नवीन कामगार कायदेसुद्धा उद्योगपतीधार्जिणे आहेत. कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचे दर प्रचंड महाग झाले असून लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे, असे पटोले म्हणाले.

(हेही वाचा : महाविकास आघाडीची ऑटो आता भाजपा करणार पंक्चर)

राज्यभरातील काँग्रेसचा भारत बंदला सक्रिय पाठिंबा!

बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सुशिक्षित तरुणांच्या भविष्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पोळकच ठरले असून ज्या नोकऱ्या होत्या त्याही कमी होत आहेत. उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत वाढ होत आहे. मोदी सरकारच्या काळात ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी झाली आहे. या सर्वाला केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात भारत बंदच्या रुपाने एल्गार पुकारलेला आहे. सोमवारच्या भारत बंदमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालयात काँग्रेसचे प्रमुख नेते, पक्षाचे पदाधिकारी सहभागी होत आहेत. नाना पटोले अकोला येथील रॅलीत सहभागी होतील. व्यापाऱ्यांनीही या भारत बंदमध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतरही सरकारला जाग आली नाही तर भविष्यात पुन्हा तीव्र आंदोलन करु असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.