काँग्रेसचे पदाधिकारी भाजपच्या दारी

134

काँग्रेसचे नगरमधील शहर जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांनी सोमवारी चक्क भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे काँग्रेस पुन्हा चर्चेत आले आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आणि नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना आक्रमकपणे विरोध करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी विखेंची भेट घेतल्याने ही चर्चा रंगली आहे. नगरमधील रेल्वे प्रकल्प आणि किल्ल्याच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत हे पदाधिकारी?

या पदाधिका-यांमध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळे, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपातील माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांचा समावेश आहे. खासदार या नात्याने त्यांची भेट घेऊन नगरकरांच्या या महत्त्वपूर्ण विषयाकडे त्यांचे लक्ष आम्ही काँग्रेसच्या वतीने वेधले आहे. त्यासोबतच नगरच्या भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. संरक्षण खात्याच्या ताब्यात असणारा हा किल्ला नागरिकांना पाण्यासाठी दररोज खुला नसतो. किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याकडे वर्ग करण्याचीही मागणी आम्ही खासदार विखे यांच्याकडे केली आहे. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे हा नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यामुळे ही दोन शहरे अधिक जवळ येऊ शकणार आहेत. खासदार विखे पाटील जरी भारतीय जनता पार्टीचे नेते असले, तरी देखील ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन या भेटीची वेगळी चर्चा आहे.

(हेही वाचा आता ‘आप’चे लक्ष्य नऊ राज्ये!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.