काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; CM Eknath Shinde यांचा आरोप

91

विदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी केली.

भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यावर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल, असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाऊन विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना केले. राहुल गांधी यांच्या या विधानावर शिंदे यांनी आज X या  समाजमाध्यमातून टीका केली.

आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल  गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना आणि  महायुतीतील सहकारी पक्ष  आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशारा शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला आहे.

(हेही वाचा Sharad Pawar यांच्या उपस्थितीत महारावांकडून श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान; गुरुवारी राज्यभर आंदोलन)

आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणे  हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही, असे स्पष्ट करत शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

भाजप आरक्षण बंद करू देणार नाही: फडणवीस

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपविण्याबद्दल बोलले आहेत.  एकाबाजूला निवडणुकीत खोटे कथानक तयार करायचे आणि दुसरीकडे  आरक्षण संपविण्याची गोष्ट करायची हे अतिशय चुकीचे आहे.  भारताच्या संविधानाचा आणि  संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. काँग्रेसने  बाबासाहेबांना  लोकसभेवर सुद्धा निवडून जाऊ दिले नाही.  दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारा हाच  काँग्रेस पक्ष  मतसांसाठी कशापद्धतीने खोटे कथानक तयार करतात हे राहुल गांधींच्या विधानाने स्पष्ट झाले आहे. भाजप आरक्षणाच्या बाजूने असून आम्ही हे आरक्षण बंद करू देणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.