- सुजित महामुलकर
राज्यात अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेसने आपला उमेदवार घोषित करतानाच अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या विजयाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये जी मतविभागणी झाली त्याचा फायदा अनुप यांचे वडील संजय धोत्रे यांना झाला, तीच परिस्थिती यंदाही अकोल्यात निर्माण झाल्याचे चित्र आहे. (Congress)
तिरंगी लढत
अकोल्यातून भाजपाचे अनुप धोत्रे हे महायुतीचे उमेदवार असून महाविकास आघाडीकडून अभय पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, धोत्रे यांना लोकसभेत जाण्याचा मार्ग सोपा झाल्याचे बोलले जात आहे. (Congress)
(हेही वाचा – IPL 2024 : कोलकाताचा १७ एप्रिलचा सामना पुढे ढकलणार की, जागा बदलणार?)
मतविभागणीचा फायदा
संजय धोत्रे यांनी गेल्या चार निवडणुकीत विजय मिळवला असून यावेळी त्यांचे पुत्र अनुप यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत धोत्रे २.७५ लाख मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांना एकूण ५.५४ लाख मते पडली होती तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना २.७८ लाख आणि महाविकास आघाडीचे तेव्हाचे काँग्रेस उमेदवार हिदायतुल्ला पटेल यांना २.५४ लाख मते मिळाली होती. या आकडेवारीवरून महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीच्या मतविभागणीचा फायदा धोत्रे यांना झाल्याचे स्पष्ट होत असून यावेळीही तशीच परिस्थिती आहे. (Congress)
विजयाचा मार्ग सोपा
विशेष म्हणजे २०१४ आणि २००९ या निवडणुकीतही याच मतविभागणीचा फायदा भाजपाला झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०१४ ला धोत्रे २.३ लाखाच्या फरकाने निवडून आले होते आणि आंबेडकर यांना २.३८ लाख आणि पटेल यांना २.५३ लाख मते मिळाली होती. तसेच २००९ ला धोत्रे यांचा विजय ६४ हजार मतांनी झाला होता आणि आंबेडकर यांना २.२२ लाख आणि काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर यांना १.८२ लाख मते पडली होती. असे असतानाही काँग्रेस आणि वंचित आघाडीने कोणताही धडा न घेता भाजपाला विजयाचा मार्ग सोपा करून दिल्याची चर्चा होत आहे. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community