महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतले जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. या दोन्ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. तर भिवंडी लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे राज्यातले नेतृत्व त्यांच्या या दोन पारंपरिक जागा आपल्याकडे घेऊ शकले नाही, असे म्हणत राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका होत आहे. (Ashok Chavan)
(हेही वाचा नाराज Congress सांगलीत उबाठाच्या उमेदवाराला पाडणार? )
काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे नुकतेच भाजपात दाखल झाले आहेत. भाजपावासी झाल्यावर चव्हाण यांनीदेखील काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. सांगली आणि भिवंडीची जागा काँग्रेसला मिळाली नसल्यामुळे चव्हाण यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला आहे. सांगलीत काँग्रेस कमकुवत नाही तर पक्षाचं राज्यातील नेतृत्व कमकुवत आहे, असे म्हणत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले. चव्हाण यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता असं बोललं जात आहे. काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व कमकुवत बनले आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
Join Our WhatsApp Community