हिवाळी अधिवेशनात महिला सदस्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्याचा विचार; राहुल नार्वेकरांची माहिती

88

हिवाळी अधिवेशनात नवे सदस्य आणि महिला सदस्यांसाठी एक दिवस राखून ठेवण्याचा विचार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते.

( हेही वाचा : शिवसेना चालते राष्ट्रवादीच्या ‘घड्याळाच्या काट्यावर’ )

यासंदर्भात नार्वेकर म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात एका विशिष्ट प्रदेशातील समस्यांवर चर्चा घडवून आणण्याची कोणतीही तरतुद विधिमंडळ कामकाजाच्या नियमात नाही. हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच निवडून आलेले सदस्य तसेच महिला सदस्यांच्या चर्चेसाठी एक दिवस राखून ठेवण्याचा विचार नक्कीच करण्यात येईल. यासाठी कामकाज सल्लागार समितीत हा विषय मांडण्याचा प्रयत्न करू असे नार्वेकर यांनी सांगितले. यासोबतच विदर्भातील समस्यांवर चर्चेसाठी एक दिवस राखीव ठेवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चाचपणी करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात विधान भवन परिसराचा विस्तार करण्यात येईल. नागपूर विधिमंडळ परिसरात सेंट्रल हॉलची नितांत गरज आहे. मात्र विस्तारासाठी जागा कमी पडत आहे. भविष्यातील विस्तारासाठी सोयीस्कर जागा संपादित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्या नंतर विधिमंडळ तसेच आजूबाजूच्या परिसरात विस्तार करण्यात येईल. मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला. त्याची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या वागणुकीसाठी नियमावली ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली होती. या समितीची अजून एकही बैठक होऊ शकली नाही. मात्र निवडून येणारे लोकप्रतिनिधी जबाबदारीनेच वागतात. त्यांनी तसे वागावे अशी अपेक्षा असते असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशनानंतर विधानभवन वर्षभर बंदच असते. येथे सुसज्ज वाचनालय तसेच प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत. हे लक्षात घेता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण सत्र वर्षभर येथे चालवता येईल. वर्षभरात संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण पूर्ण होईल. या बाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.