सुशांत सावंत
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता, ज्यामध्ये एक महिला अधिकाऱ्याचा समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर सरकारची विकेट घेण्याचा प्रयत्न करणारे ‘ते’ अधिकारी कोण? यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असे सांगत यु टूर्न घेतला.
शरद पवारांनी फटकारले?
गृहमंत्र्यांचे हे धक्कादायक विधान असलेले वृत्त प्रसारित होताच याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आणि त्यांनी गृहमंत्री देशमुख यांना असे वक्तव्य जाहीररीत्या करणे योग्य नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधीशी खासगीत बोलताना दिली. शरद पवारांच्या नाराजीमुळे आणि अधिकारी वर्गात चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून गृहमंत्र्यांनी ‘मी तसे म्हणालोच नाही,’ असे सांगत सारवासारव केली.
काय म्हणाले गृहमंत्री?
पोलीस खात्यात काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नाव घेता येणार नाही, असे चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले, असे वक्तव्य गृहमंत्री देशमुख यांनी केले.
शरद पवारांनी शिकवणी घ्यावी – प्रसाद लाड
भारताची जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी या प्रकरणी गृहमंत्री देशमुख यांच्यावर टीका केली. महिला अधिकाऱ्यांचे नाव घेणे अशोभनीय आहे. देशमुख यांना त्यांचे नेते शरद पवार यांच्याकडून धडे घ्यावेत.
Join Our WhatsApp Community