खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र – कामिनी शेवाळेंचा खुलासा

152

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. ही महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबियांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती. याची दखल घेऊन 11 जुलै 2022 रोजी या महिलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यानुसार या महिलेच्या विरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे, असे खासदार राहूल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे यांनी खुलाशात म्हटले आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने थेट न्यायासाठी मुख्यमंत्री यांचे दार ठोठावले आहे, या तरुणीने मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून मला न्याय द्यावा, अशी मागणी करत हे पत्र तिने ट्विटर वर टाकले आहे. त्यावर शेवाळे यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे यांनी खुलाशा केला आहे.

(हेही वाचा मला न्याय द्या! खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणा-या तरुणीचे मुख्यमंत्र्याना पत्र)

त्या महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची

या खुलाशात कामिनी शेवाळे म्हटले की, महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी या महिलेच्या विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे 80 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच या महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी या महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

राहुल शेवाळे यांची बदनामी करण्याचे षड्यंत्र

खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षड्यंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते, असे खासदार राहूल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.