केंद्रीय नीती आयोगाच्या धर्तीवर राज्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र इन्स्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आर्थर म्हणजेच ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र असून, त्यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. शिवाय भाजपामधूनही या निर्णयाला विरोध होत आहे.
राज्य सरकारने ‘मित्र’च्या नियामक मंडळावरील दोन उपाध्यक्षांच्या नियुक्तीचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी जारी केला. अजय आशर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यातील आशर यांच्या नियुक्तीवरून राजकीय वादंग निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अशी अजय आशर यांची ओळख आहे. जवळपास एक दशकाहून अधिक काळ ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत कार्यरत आहेत.
महाविकास आघाडीच्या काळात आशर हेच नगरविकास विभागाचे निर्णय घेत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून करण्यात आला होता. भाजपा नेते आशिष शेलार, मिहीर कोटेचा, किरीट सोमय्या यांनी आशर यांच्यावर आरोपही केले होते. आशर यांच्या व्यवहारांवर केंद्रीय तपास यंत्रणांची काही काळ नजर असल्याचे बोलले जात होते. मात्र, कोणत्याही गैरव्यवहारात आशर यांचे नाव नोंदविण्यात आलेले नाही अथवा त्यांची चौकशीही झालेली नाही.
परंतु, ठाकरे सरकारच्या काळात भाजपा नेत्यांनी आशर यांच्याविरोधात केलेली विधाने आता विरोधकांनी समोर आणण्यास सुरुवात केल्याने भाजपाची कोंडी होऊ लागली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव गटाकडून हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाल्याने भाजपाकडून आशर यांच्या नियुक्तीला विरोध होत असल्याचे कळते.
अधिवेशनात आवाज उठवणार
आशर यांच्या नियुक्तीला काँग्रेसने विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजय आशर यांच्या नियुक्तीला सहमती आहे का, याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मागच्या सरकारच्या काळात अजय आशरवर आरोप करणाऱ्या भाजपाचे मनपरिवर्तन झाले आहे. काल ज्या व्यक्तीवर आक्षेप घेतला, त्याच व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणे कितपत योग्य आहे, या महत्त्वाच्या पदावर एका लुटारूची नियुक्ती करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. वेळ पडल्यास हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाजही उठवू, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
Join Our WhatsApp Community