वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसला युती करायची असेल तर आमच्या ई-मेलला ते पुढील ७ दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा आमच्या योजनेनुसार लोकसभेच्या सर्व ४८ जागा आम्ही लढवणार, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला दिला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, १ सप्टेंबर रोजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक ई-मेल लिहिला आहे. हा ई-मेल त्यांना दोन प्रमुख कारणांसाठी लिहिला होता. एक म्हणजे मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचित बहूजन आघाडीला आमंत्रण पाठवले असल्याच्या अफवा खोडून काढण्यासाठी विनंती करणे आणि दुसरे म्हणजे युतीसाठी वंचितचे दरवाजे खुले आहेत हे सांगणे. परंतु खर्गे किंवा काँग्रेसमधील त्यांच्या सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यांच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
आज भाजप-आरएसएस देशाला बरबाद करत आहेत जर इंडिया आघाडी भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत ६.९८ आणि ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीत का सामील केले गेले नाही ? याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. जर काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची असेल तर ते पुढील ७ दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करु असा इशारा आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला.