पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सामान्य माणसांचे जगणं कठीण झाले असताना भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केल्याची चर्चा आहे. दरम्यान, वाढत्या महागाईचे सदाभाऊ खोत यांनी वाढत्या महागाईचे उघडपणे समर्थन केले आहे. सदाभाऊ खोत हे चाळीसगावमध्ये आले असताना त्यांना महागाई संदर्भात प्रश्न करण्यात आला. त्यावेळी त्यांनी महागाईचे समर्थन केले आणि कशाची महागाई आली? आणि कुठली महागाई? असा सवाल देखील त्यांनी उपस्थितीत केला.
काय म्हणाले सदाभाऊ ?
‘कोण धाडस करेल, कुठला पक्ष महागाईच्या समर्थनाचे धाडस करेल पण मी धाडस केले, कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळ झाले तरी लोक घेतात ना? तेव्हा महागाई दिसत नाही, देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग महागाई नाही वाढली का? महागाई झाली तरी लोकं दारू पिणे सोडता का? कांदा डाळींच्या किंमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल. या महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
(हेही वाचा – … म्हणून मुंबई विमानतळ राहणार ६ तासांसाठी बंद!)
पुढे सदाभाऊ असेही म्हणाले की, देशाला पुरेल इतकं तेल देण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. सोयाबिनचा भाव आणि तेलाचा भाव जो वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिश्यात पैसा येईल, मजुरांची मजुरी वाढेल, गरिबाला तेल खायला परवडत नाही, त्यांचीही मजुरी वाढून जाईल, सोयाबिनचा भाव वाढला तर, त्यामुळे महागाईच्या नावाखाली शेतकऱ्यांचं वाटोळे होत आले आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 50 रूपयांची वाढ करण्यात आली, त्यामुळे सिलिंडरचे दर हजार रूपयांपर्यंत पोहोचले.1 मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ झाली. या वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.