राज्यात काँग्रेसने नेतृत्वात बदल केला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बनल्यापासून काँग्रेस अधिक आक्रमक बनली आहे. महा आघाडीत असतानाही पटोले स्वबळाची भाषा करत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजीचा सूर आहे. त्यातच काँग्रेसला महाविकास आघाडीत अपेक्षित महत्व दिले जात नसल्यानेही काँग्रेसचे नेते नाराजी व्यक्त करतात, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी सुरु आहे, असे वृत्त येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्यासह काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत सध्या आघाडीत सुरु असलेल्या मतभेदांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
मंगळवारी, १३ जुलै रोजी संध्याकाळी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच.के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरीवर चर्चा केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय केंद्र सरकारने नवे सहकार खाते निर्माण केले आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा : भाजप बहुजनविरोधी पक्ष! नाना पटोलेंची टीका)
आरक्षणावर पवारांचा सल्ला
या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही चर्चा झाल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारने विधानसभेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ठराव मंजूर केले आहेत. हे ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यावरही अशोक चव्हाण यांनी पवारांचा सल्ला घेतल्याचे सांगितले जात आहे.
पटोलेंची अनुपस्थिती!
यावेळी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा समावेश नव्हता. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी भाषणात बोलताना थेट राष्ट्रवादीवर टीका केली. त्यावर बोलताना शरद पवार यांनी पटोले यांचा ते छोटे नेते आहेत, असे सांगत अपमान केला होता. त्यामुळे पटोले यांनी पवारांना भेटण्याचे टाळले, अशी चर्चा रंगली.
Join Our WhatsApp Community