महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कारभारावरून उद्धव सेना आणि राष्ट्रवादीत सामना रंगल्याचे दिसून येत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर स्वपक्षीय नेत्यांसंबंधात तातडीने भूमिका घेतात, आमच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करतात, असा उद्धव गटाचा आरोप आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपशब्द उच्चारणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना राज्य महिला आयोगाने तातडीने नोटीस पाठवली. तसेच कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्याच प्रकारचा गुन्हा मंत्री गुलाबराव पाटील यांनी करूनही त्यांच्यावर महिला आयोगाने कारवाई का केली नाही, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडून सिलेक्टिव काम केले जाण्याची अपेक्षा नसल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे.
चाकणकर यांनी फोन उचलला नाही
अंधारे यांनी म्हटले आहे की, मी महिला आयोगावर टीका करत नाही, तर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते की, त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करावी. मी रुपाली चाकणकर यांना दोनवेळा गुलाब पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात फोन केला, पण चाकणकर यांनी फोन उचलला नाही, असा आरोपही अंधारे यांनी केला.
सिलेक्टिव्ह वागू नका – अंधारे
माझा महिला आयोगाला सवाल आहे की, जर अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता, तर गुलाब पाटील यांना नोटीस का बजावत नाही. दोघेही गुन्हेगारच आहेत. राज्य महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये. फक्त अब्दुल सत्तार यांना नोटिसा काढू नये. काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी असा केला होता. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.
Join Our WhatsApp Community