Lok Sabha Election 2024 : हिंगोली, परभणीत मविआत विसंवाद; डाव्या घटक पक्षांनी दिले उमेदवार 

महाविकास आघाडीचा भाग असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिंगोलीतून शंकर सिदम तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने परभणीतून राजन क्षीरसागर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

176

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीत डाव्या पक्षांचा सहभाग असतानाही माकप आणि भाकपने अनुक्रमे हिंगोली, परभणीत आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतील विसंवाद समोर आला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या आठ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ८ एप्रिल रोजी संपल्यानंतर येथील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिंगोलीतून शंकर सिदम तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने परभणीतून राजन क्षीरसागर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने या दोन्ही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत.

अमरावतीमधून डॉ. राजेंद्र गवई यांची माघार

अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी माघार घेतली आहे. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून आपली उमेदवारी कायम ठेवली असून वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या आठ मतदारसंघात २०४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ३७ तर सर्वात कमी म्हणजे १५ उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघात आहेत.

प्रचारासाठी डमी बॅलेट युनिट वापरता येणार

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात उमेदवारांना डमी बॅलेट युनिट वापरता येणार आहे. उमेदवार मतदारांना आपले नाव आणि निवडणूक चिन्ह कुठे आहे हे सांगून मतदारांना आपल्या नावासमोरील बटन दाबण्याचे आवाहन करू शकतात. अर्थात त्यासाठी बॅलेट युनिटच्या निम्म्या आकाराचे पुठ्ठा किंवा प्लास्टिक बनावटीचे डमी युनिट वापरता येईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची संख्या

बुलढाणा-२१, अकोला-१५, अमरावती- ३७, वर्धा- २४, यवतमाळ -वाशिम-१७ , हिंगोली- ३३, नांदेड – २३, परभणी-३४

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.