संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव आणि इतर ऐतिहासिक चित्रपटांवर घेतलेल्या आक्षेपानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राडेबाजी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेमागृहात हर हर महादेव या सिनेमाचा शो सुरू होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात शिरुन शो बंद पाडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना हाणामारी देखील केली. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी बंद पाडलेला शो पुन्हा सुरू करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली.
प्रेक्षकांना मारहाण
ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृहात हर हर महादेव या सिनेमाचा रात्री 10चा शो आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला आणि प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी सिनेमागृहातील प्रेक्षकांनी शो पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना बेदम मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अविनाश जाधव यांच्यासह सिनेमागृहात जाऊन पुन्हा शो सुरू केला.
आव्हाडांवर ‘मनसे’ घणाघात
जर तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करत असाल तर सिनेमागृहात येऊन प्रेक्षकांना मारझोड करणं हे संस्कृतीला धरुन आहे का? ज्याला मारहाण करण्यात आली ती व्यक्ती दारू प्यायले असल्याचे जितेंद्र आव्हाड सांगत आहेत. पण अशा व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य होते. तुम्हाला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला?, असा थेट सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.
तुम्ही काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री होतात त्यामुळे तुम्ही कायदा हातात कसा काय घेऊ शकता. त्यामुळे मारझोड करणं ही तुमची सवय असल्याचे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले आहे, अशी संतप्त टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी आव्हाड यांच्यावर केली आहे.
समोर या, राज ठाकरेंचे मावळे बसले आहेत
या सर्व प्रकारामुळे प्रेक्षक जर हा सिनेमा बघण्यासाठी घाबरत असतील तर माझं लोकांना आवाहन आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे पक्ष हा तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे पुढच्या पाच मिनिटांत आम्ही हा सिनेमा पुन्हा सुरू केलेला आहे. ही सगळी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विरोध करायचा असेल तर समोरुन करा. राज ठाकरे यांचे मावळे इथे बसलेले आहेत, असे आव्हानही अविनाश जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांना केले आहे.
Join Our WhatsApp Community