भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी निधन झालं. लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. याच शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली. यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले, लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको…शिवाजी पार्कात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती स्थळ आहे. त्यातच आता भाजपाकडून शिवाजी पार्कात लता मंगेशकर यांचे स्मृती स्थळ उभारण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता लता दीदींच्या स्मारकावरून चांगलाच वाद रंगणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.
काय म्हणाले राऊत…
लता दिदी या महान आत्मा होत्या. आपल्या धरतीवर त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचं नातं होतं. या देशात त्यांनी जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर आहेत, अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. बोलू द्या. त्यांचं स्मारक बनवणं इतकं सोपं नाही. त्या काही राजकीय नेत्या नव्हत्या. त्या खूप मोठ्या होत्या. महान होत्या. त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल, असं राऊत म्हणाले. राऊत असेही म्हणाले की, लता दीदीचं स्मारक होईल पण या स्मारकाचा राष्ट्रीय स्तरावर विचार केला जावा असेही संकेत दिलेत.
(हेही वाचा – “सोमय्यांचे हात-पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश”)
दरम्यान, भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या ठिकाणी त्या पंचतत्वात विलीन झाल्या, तिथे त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, या मागणीचा विचार करून तात्काळ स्मारक उभारायला हवे. कारण हे स्थळ जगासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असे आमदार राम कदम यांनी पत्रात नमूद केले आहे.
काय म्हटले राम कदमांनी पत्रात
लतादीदींवर शिवाजी पार्क दादर, येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच जागी शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारुन त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यावधी संगीत प्रेमी व लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहेत. तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे, असं राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
Join Our WhatsApp Community